घरगुती गॅसचा अवैध साठा व काळाबाजार करणाऱ्या दुकानावर छापा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 गॅसचा अवैध साठा व काळाबाजार करणाऱ्या दुकानावर छापा

१०३ गॅस सिलेंडरसह आरोपी ताब्यात

पुणे/सतीश जाधव

मा. वरिष्ठांनी अवैध धंदे व अभिलेखावरील आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपास पथकातील अधिकारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हांडेवाडी परिसरात एक इसम घरगुती गॅसमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅस ट्रान्सफर करत आहे.

सदर माहितीच्या आधारे घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, “काव्या मल्टी सर्व्हिसेस” या दुकानाजवळ मारुती सुझुकी कंपनीचा सुपर कॅरी टेम्पो आढळून आला. त्या वाहनात घरगुती व व्यावसायिक गॅस टाक्या ठेवलेल्या दिसून आल्या. दुकानात तपासणी केली असता, आरोपी मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने घरगुती गॅस टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये तसेच ५ किलोच्या टाक्यांमध्ये गॅस ट्रान्सफर करत असल्याचे आढळून आले.

त्या इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव-पत्ता विचारले असता त्याने नितीन हनुमंत होळकर (वय ३८ वर्षे, रा. हांडेवाडी, पुणे) असे सांगितले. त्याच्याकडे गॅस साठवणुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

कारवाईदरम्यान एकूण १०३ गॅस सिलेंडर व चारचाकी वाहन, असा अंदाजे ₹१०,०९,३००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १६४/२०२६ अन्वये आवश्यक वस्तू अधिनियम कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त (परिमंडळ ६) पुणे शहर श्री. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त (हडपसर विभाग) श्री. अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.