विद्यार्थ्यांकडून पुणेकरांना वाहतूक नियमन व शिस्तीचे धडे !
पुणे,प्रतिनिधी: -रस्त्यावरची घाई, सिग्नल तोडण्याची सवय आणि नियमांकडे होणारे दुर्लक्ष या पाश्र्वभूमीवर शिवाजीनगर वाहतूक विभाग अंतर्गत राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताह या निमित्ताने जनजागृती अभियान करणेकरिता वीर चाफेकर चौक ते सिमला चौक अशी पायी प्रबोधन रॅली काढण्यात आली.
सदर रॅली मध्ये मॉडर्न कॉलेजचे एनसीसी कॅडेट्स, वाहतूक अंमलदार, वार्डन यांचा सहभागातून वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचा प्रत्यक्ष संदेश देणारे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले.
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शिवाजीनगर वाहतूक विभागाच्या वतीने १ ते ७ जानेवारी या कालावधीत शिवाजीनगर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद दोरकर आणि पी एस आय गौरी झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानादरम्यान ‘एनसीसी’ कॅडेट्सना वाहतुकीचे मूलभूत नियम, वाहतूक चिन्हे व फलक, सिग्नल यंत्रणेचे कार्य, झेब्रा क्रॉसिंगचे महत्त्व, नो पार्किंग व डबल पार्किंगचे दुष्परिणाम, तसेच वाहतूक नियमनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे पालन का आवश्यक आहे? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर कॅडेट्सनी वीर चाफेकर चौक आणि शिमला ऑफिस चौक येथे सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना ‘वाहतुकीचे नियम पाळा’ असा संदेश देणारे फलक दाखवत जनजागृती केली.
